श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात मंत्री विखे पाटील यांच्याकडून प्रचार...तालुक्याच्या रोजगारसाठी औद्योगिक वसाहतीला महायुती सरकरच्या माध्यमातून जागा : विखे

श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात मंत्री विखे पाटील यांच्याकडून प्रचार...तालुक्याच्या रोजगारसाठी औद्योगिक वसाहतीला महायुती सरकरच्या माध्यमातून जागा : विखे

S9 NEWS / सुजित गायकवाड / श्रीगोंदा


तालूक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीला महायुती सरकरच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच तालूक्यात उद्योजकांचे आगमन होऊन आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. असे होत असताना नव्याने निर्माण होणारे औद्योगिक क्षेत्र आपल्याला दहशदमुक्त ठेवायचे आहे. धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती आपल्याला निर्माण करायची नाही, असे भावनीक आवाहन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
         श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात मंत्री विखे पाटील यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधला. प्रचार फेरी, व्यक्तीगत गाठीभेटी, वाडीवस्त्यावर बैठका घेवून महायुतीच्या पदाधिकांऱ्यांनी तालुका पिंजून काढला. यावेळी मंत्री विखे पाटील यांच्यासह, विक्रमसिंह पाचपूते, राजेंद्र नागवडे, विनायक देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी आपल्या संपुर्ण दौऱ्यात केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देतानाच, जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन केले असल्याचे सांगितले. औद्योगिक आणि तिर्थक्षेत्र विकासातून रोजगार निर्मिती केली जाईल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले.
जिल्ह्यात तीन औद्योगिक वसाहतीसाठी महायुती सरकारने जागांची उपलब्धता करून दिली असून उद्योजक आपल्या जिल्ह्यात येण्यास उत्सूक झाले आहेत. उद्योजक आणि कामगार यांना संरक्षणाची हमी दिल्याने औद्योगिक दृष्ट्या नगर जिल्हा मुख्य व्यापारी केंद्र होईल.  असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
सुपा औद्योगिक वसाहतीबद्दल सांगताना ते म्हणाले, या वसाहतीतील उद्योजक धाक, दडपशाहीमुळे निघून गेले. औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारीने हैदोस घातला होता. हे वातावरण आपल्याला श्रीगोंद्यात होऊ द्यायचे नसेल तर लोकसभा निवडणुकीत  मतदान करताना गांर्भीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या विकासात अडथळे निर्माण करणारे कोण आहेत? ही ओळखण्याची वेळ आता आली आहे. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपला संघर्ष थांबलेला नाही. येणाऱ्या काळात हक्काचे पाणी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.