S9 NEWS / शिर्डी
शिर्डी शहरात नुकताच एका उच्च शिक्षित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करीत सार्वजनिकरित्या अपमानीत केल्याप्रकरणी धनगर गल्लीतील हिराबाई अरुण गोंदकर व निलेश अरुण गोंदकर यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कलम ३ (१) (r) व (s) प्रमाणे शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी तरुणी आणि तिचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून सदर ठिकाणी रहिवासी असून गोंदकर यांच्याकडून छोट्या छोट्या कारणातून पीडित परिवाराशी वारंवार भांडणं व शिवीगाळ करण्यात येत होती. दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घरासमोर फोनवर बोलत असलेल्या फिर्यादी मुलीस हिराबाई गोंदकर हिने वाईट शिवी देत जातीवाचक शब्दांचा उल्लेख केला, त्यावर तरुणीने लागलीच घरात जात आपल्या आईला प्रकार सांगितला त्यानंतर आईने व आत्याने बाहेर येत हिराबाई हिस जाब विचारले असता हिराबाई आणि तिचा मुलगा निलेश यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व तुम्ही हलक्या जातीचे बाहेरून आले वगैरे संबोधत शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी डीवायएसपी शिरीष वमने यांच्याकडून तपास सुरु असून अद्याप आरोपीना अटक करण्यात आलेली नाही.
शिवाय याच प्रकरणात आरोपींचा नातेवाईक व शिर्डीतील माजी उपनगराध्यक्ष असलेला सुजीत ज्ञानदेव गोंदकर व त्याचे वडील ज्ञानदेव भागचंद गोंदकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात येत पीडितेचा आतेभाऊ व एस ९ चॅनल चे संचालक असलेले सागर सीताराम सावकारे यांना जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तुम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करील अशी धमकी देत पुन्हा अवमानजनक कृत्य केले. व जातीवाचक शिवीगाळ करीत धमकावत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबत सावकारे यांनी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून सुजीत गोंदकरवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर वमने यांनी तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून अदयाप कारवाई प्रतीक्षेत आहे.
या प्रकाराने शिर्डीत खळबळ उडाली असून सभ्य समाजात अजूनही जातपात मानली जात असून शिर्डीसारख्या धार्मिक ठिकाणी असले गंभीर प्रकार घडत आहे.