शिर्डीच्या मटका किंगच्या मुख्य अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा...आरोपी अनुप गायकवाडसह बाळू महाले फरार...१ लाख ४९ हजारांचे साहित्य जप्त..!!

शिर्डीच्या मटका किंगच्या मुख्य अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा...आरोपी अनुप गायकवाडसह बाळू महाले फरार...१ लाख ४९ हजारांचे साहित्य जप्त..!!

S9 NEWS / शिर्डी 


शिर्डी पोलीस स्टेशन हददीत मटका व्यवसायाचा किंग असलेला अनुप गायकवाड व त्याचा साथीदार बाळू महाले यांच्या मुख्य अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत १ लाख ४९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अनुप गायकवाड बाळू महाले सह अन्य ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून शिर्डी शहर व परिसरात अनुप गायकवाड कल्याण मटका हा हार-जितीचा जुगार धंदा चालवीत असून आजवर त्याने व बाळू महाले याने कोट्यवधी रुपयांची माया जमा केली आहे. पोलीस ठाण्यातील काही मंडळींशी जवळीक करून बिनदिक्कत धंदा चालविण्यात दोघेजण माहीर असून वारंवार वृत्त प्रसारित करूनही कारवाई केली जात नव्हती, मात्र शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या धर्तीवर कारवाई मोहीम सुरु झाली व छोट्या धंद्यांवर छापे टाकण्यात आले.त्यात एस ९ चॅनल ने मागणी केल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धंद्याचा मुख्य सूत्रधार अनुप गायकवाड याचा निघोज येथील साथीदार बाळू महाले याच्या राहत्या घराच्य दुसऱ्या मजल्यावर छापा टाकत कारवाई केली.
या कारवाईत रोख रकमेसह प्रिंटर टॅब मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आलं.
या ठिकाणी सचिन संजय बर्डे वय २९ रा.निघोज,काळेनगर,विकास ज्ञानदेव चौधरी वय ३० रा.नांदुर्खी ता.राहता, पंकज त्रिलोक चावला वय ३८ रा.दत्तनगर पिंपळवाडी ता.राहाता,शुभम राजेंद्र नांगरे वाया २७ रा.सुरेगाव ता.कोपरगाव, संतोष तपशीलप्रसाद हालवाई उर्फ गुप्ता वय ५८ रा.नागफणी चौक कोपरगाव आदी आरोपी आढळून आले असता त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी धंद्याचे मालक बाळासाहेब उर्फ बाळू महाले रा.निघोज ता.राहाता व अनोक उर्फ अनुप गायकवाड रा.शिर्डी हे असल्याचे पथकास सांगितले. त्यानुसार वरील सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम १२ (अ),४,५ अन्वये सरकारतर्फे गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


कारवाई केवळ दाखविण्यापुरती..??
दरम्यान बाळू महाले याच्या इमारतीमध्ये हा मुख्य धंदा असून संपूर्ण राज्यातून याठिकाणी सौदा घेतला जातो असं असतानाही पोलीस पथकाला फारसा काही मुद्देमाल हाती लागला नाही हे विशेष.
ही कारवाई केवळ दाखविण्यापुरती होती की खरंच काही हाती लागले नाही? किंवा कारवाईची आधीच चाहूल आरोपीना लागली ? हे गुलदस्त्यात आहे.
किमान यापुढे अनुप गायकवाड व बाळू महाले याचा हा मोठा धंदा कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी पोलीस पथकानं ठोस कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे .